क्राईम
आंघोळ करताना अल्पवयीन तरुणीचा व्हिडीओ काढला

- एका 19 वर्षीय तरुणाविरुद्ध एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका तरुणीचा नग्न व्हिडीओ चोरीछुप्या पद्धतीने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी नवी मुंबईतील दिघा परिसरातील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- या प्रकारामुळे पीडित मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर ती प्रचंड तणावाखाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 ते 23 जून 2025 या कालावधीत आरोपी मोहम्मद कैफ याने फिर्यादीसोबत इंस्टाग्रामवर व्हिडीओ कॉल केला होता. या दरम्यान, फिर्यादी अंघोळ करत असताना तिच्या नकळत तिचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. पीडितेला याची कल्पना नव्हती. आरोपीने हा व्हिडीओचा नंतर गैरवापर केला. आपल्याबरोबर शरीरसंबध ठेव, असा दबाव त्याने त्या तरुणीवर टाकला. शिवाय तो व्हिडीओ दाखवत तिला ब्लॅकमेल केले.
- तरुणीने त्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात तिचा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केला. ही बाब त्या तरूणीला समजली. त्यानंतर तिला धक्का बसला. आपली यामुळे मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे हे तिला सहन झाले नाही. त्यानंतर तिने तातडीने पोलिसांत धाव घेतली. त्या तरूणाविरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे हे आरोपीला समजले. त्यानंतर तो फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



