क्राईम
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर अत्याचार

- पुण्यातील अतिशय गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीवर सकाळच्या वेळी अत्याचार झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्या. पुणे शहरात नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही. या घटनेमुळे सोलापूरकरांना धक्का बसला आहे.
- विद्येचे माहेरघर असणाऱ्या सुसंस्कृत पुण्याची ओळख काही नराधमांमुळे पुसली जाऊन महिलांच्या दृष्टीने अतिशय असुरक्षित असणारे शहर अशी नवीन ओळख निर्माण होत चालली आहे. अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यातही पुणे शहरात याचे प्रमाण जास्त आहे ही अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अनेक महिला घरापासून खूप दूरवर काम करण्यासाठी जातात. बस, रेल्वे, रिक्षा, खासगी वाहने अशा विविध मार्गाने त्यांचा प्रवास सुरूअसतो. येण्या जाण्याच्या या प्रवासात अनेक अनोळखी लोक सभोवताली असतात . कदाचित अशा महिलांवर पाळत ही ठेवली जात असावी. स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या घटनेच्या आरोपीची ओळख पटल्याचे प्रसार माध्यमांमधून समजले. तो पकडला जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल किंवा सबळ पुराव्या अभावी तो त्यातून सुटेल. पण घटनेचे गांभीर्य आपण कधी लक्षात घेणार ? इतक्या सकाळी एका अनोळखी व्यक्तीने दिलेल्या माहितीवर सहजपणे विश्वास ठेवणे आणि त्या व्यक्तीने सांगितलेले ऐकणे ही चूक त्या संबंधित महिलेने केली हेही नाकारून चालणार नाही. प्रसार माध्यमांमधून कळाले की संबंधित महिला एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती. अशा सुशिक्षित महिलेलाही त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीची खात्री करावीशी वाटली नाही ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी आहे. वास्तविक प्रत्येक बस स्थानकावर चौकशी केंद्र असते. त्या ठिकाणी जाऊन खात्री करून मगच त्या महिलेने त्या बसकडे जाणे आवश्यक होते. त्यामुळे कदाचित हा प्रकार टळला असता.त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहजपणे विश्वास ठेवणे किती घातक ठरू शकते याचा विचार करूनच अशा व्यक्तींशी संवाद साधण्याऐवजी योग्य मार्गांचा अवलंब करावा. असे प्रसंग आपल्याही कुटुंबातील महिलांसोबतही घडू शकतात. त्यामुळे सर्व माता-भगिनींना कळकळीची विनंती करावीशी वाटते की कृपया अनोळखी व्यक्तींशी संभाषण टाळा. कोणती व्यक्ती कोणत्या रूपाने समोर येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःचे रक्षण स्वतः करणे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- नितीन मिस्किन, शेळगी, सोलापूर