क्राईम
ती रात्र…बाहेर पावसाचा हलका सडा, अंधारात झाडांची सळसळ, आणि…

- मुंबईच्या अरे कॉलनीत 15 जुलैची रात्र. बाहेर पावसाचा हलका सडा, अंधारात झाडांची सळसळ आणि एका साध्या घरात घडत होता एक असामान्य प्रसंग. जो पुढे एका हत्येच्या थरारक कथेत परिवर्तित होणार होता.
- भरत लक्ष्मण अहिरे, वय 40, व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट. मेहनती, स्वाभिमानी पण घरगुती जीवनात काही काळापासून अस्वस्थता. कारण, पत्नी राजश्री अहिरे हिच्या वागण्यातले बदल. तिच्या चंद्रशेखर याच्या सोबतच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल भरतला संशय आधीपासूनच होता. गेल्या महिन्यात जेव्हा त्याने पत्नीला याबाबत प्रश्न विचारले, तेव्हा उलट त्याच्यावर छळाचे आरोप करण्यात आले.
- या तणावाच्या दरम्यान 15 जुलैच्या रात्री भरतला चंद्रशेखरचा फोन आला. आपण भेटूया, एकतानगर, युनिट 31, अरेरी कॉलनीच्या सार्वजनिक शौचालयाजवळ, असे ठरले. या भेटीसाठी भरत तयार झाला आणि त्याच्यासोबत राजश्रीही निघाली.
- त्या ठिकाणी आधीच चंद्रशेखरसोबत त्याचा साथीदार रंगा उपस्थित होता. भरतने परिस्थिती समजण्याआधीच हल्ला सुरू झाला. चंद्रशेखरचे मुठीचे आणि लाथांचे घाव भरतच्या छातीवर, पोटावर आणि शरीरावर पडत होते. रंगा मागून घट्ट पकडून ठेवत होता, जेणेकरून भरत प्रतिकार करू शकणार नाही. आजूबाजूला पावसाच्या पाण्यात मिसळलेली माती, धडपडणारा माणूस आणि निर्दयी घावांचा आवाज.
- पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे, या हल्ल्याचे साक्षीदार म्हणून काही फुटांवर राजश्री उभी होती. पूर्ण शांत, कोणतीही मदत न मागता, हल्ला थांबवण्याचा एकही प्रयत्न न करता ती उभी होती.
- घटनास्थळावर लोक गोळा होऊ लागल्यावर चंद्रशेखर आणि रंगा पळून गेले. भरत गंभीर जखमी अवस्थेत होता. पण त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्रीने त्याला थेट घरी आणले. पुढची तीन दिवस भरत वेदनेत तडफडत राहिला.
- घरातील तिन्ही मुली-13, 5 आणि 3 वर्षांच्या. आपल्या वडिलांची प्रकृती रोज ढासळताना पाहत होत्या. जेव्हा भरतला उलट्या होत होत्या आणि रक्त यायला लागले तेव्हा मोठ्या मुलीने भीतीवर मात करत नातेवाईकांना फोन केला.
- भरतची मेव्हणी घरी आली तेव्हा राजश्रीने सांगितले की, अपघात झाला आहे, बाईकवरून पडलाय. यानंतर भरतला शेवटी पाथनवाडी, मालाड (पूर्व) येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही तीच कथा पुढे रेटली गेली. भीती आणि दबावामुळे भरतनेही पोलिसांसमोर अपघाताचीच आवृत्ती सांगितली. हीच नोंद एमएलसी (मेडिको-लीगल केस) अहवालात झाली.
- पोलिसांना मात्र ही कथा पटली नाही. राजश्रीच्या निवेदनात विसंगती दिसत होत्या. भरतच्या पूर्वीच्या विधानावरून पोलिसांनी मोठ्या मुलीची चौकशी केली. तिचे बोलणे ऐकताच संपूर्ण चित्र स्पष्ट झाले.
- सगळं पाहिले.आई तिथेच होती. तिने बाबांना वाचवले नाही, त्यांना रुग्णालयात नेले नाही. मुलीने दिलेली ही साक्ष निर्णायक ठरली. पोलिसांनी राजश्री अहिरेला अटक केली. तिचा प्रियकर चंद्रशेखर पदयाची आणि साथीदार रंगा यांचा शोध सुरू आहे. भरतने पाच ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.



