क्राईम
राजकारण गेलं खड्ड्यात!

- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी रक्षा खडसेंनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, छेड काढणाऱ्या तरुणांचा तपास सुरु असून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनदेखील संताप व्यक्त केला जात आहे. आता माजी खासदार नवनीत राणा यांनीदेखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
- नवनीत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाली, व्हिडिओ बनवला, राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुलगी कोणाचीही असो, जर असे प्रकार झाले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमचे सरकार कारवाई करण्यामध्ये सक्षम आहे. दुःख एका गोष्टीचे वाटतंय की, छेड काढणारे आरोपी हे एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
- नवनीत म्हणाल्या की, तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या. पण, असे प्रकार करू नका, माझी हात जोडून विनंती आहे… राजकारण गेले खड्ड्यात, जर कोणी राजकीय व्यक्ती असे करत असेल तर भर चौकात आणून त्यांना फाशी द्यावी. जर राजकीय व्यक्तीच असे कृत्य करत असतील तर हे खूपच निंदनीय गोष्ट आहे. आमचे गृहमंत्री सक्षम आहेत. ते कडक कारवाई करणार आहेत. मुलगी कोणाचीही असो, ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहील, अशी प्रतिक्रिया नवनीत यांनी दिली.



