क्राईम
मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिला आजारपणातून मुक्त करत आहे

- राज्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिला आजारपणातून मुक्त करत आहोत व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे, असे सुसाईट नोटमध्ये लिहून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने आजारपणातून मुक्तता करण्यासाठी पत्नीचा गळा दाबून खून केला. नाशिकच्या जेलरोड परिसरात ही घटना घडली आहे.
- त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना नारायण बापू नगरच्या एकदंत अपार्टमेंटमध्ये घडली.
- लता मुरलीधर जोशी (वय ७१), मुरलीधर रामचंद्र जोशी (वय ८०) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
- पोलिसांच्या माहितीनुसार, जोशी दाम्पत्य एकदंत अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. त्यांची दोन्ही मुले मुंबईमध्ये राहतात. सेवानिवृत्त शिक्षिका लता चार वर्षांपासून आजारपणाशी लढा देत होत्या. त्यामुळे मुरलीधर यांनी त्यांच्या सेवेसह घरातील कामे करण्यासाठी एका संस्थेमार्फत सीमा राठोड या विवाहितेला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सर्व काम करत असताना मुरलीधर यांनी एक हजार रुपये राठोड यांना देऊन घरातील काही वस्तू आणण्यास व त्यांची स्वतःची कामे करून संध्याकाळी येण्यास सांगितले होते.
- बुधवारी दुपारी केअर टेकर सीमा या घरकाम आटोपून निघून गेली. त्यानंतर मुरलीधर यांनी चिठ्ठी लिहून पत्नीचा गळा आवळला व स्वत: ही गळफास घेतला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राठोड पुन्हा घरी आल्या व त्यांनी त्यांच्याजवळील चावीने दरवाजा उघडला असता वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यच्च्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घरात सुसाईड नोट आढळून आली.
- आत्महत्येपूर्वी मुरलीधर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझे पत्नी लतावर खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळून असून आजाराला वैतागून गेली आहे. तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे. घरकाम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लता हिची खूप सेवा केली. तिच्यासाठी ५० हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावे. आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेदेखील ठेवले असून अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये.
- तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे असे सर्व घालून अंत्यसंस्कार करावे. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही, असा मजकूर चिठ्ठीमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.