ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; दोघांचा मृत्यू

राज्यातील अनेक शहरांचे तापमान 40 अंशाच्यावर पोहचले आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट समोर आले आहे. गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर शहरातील आकाशवाणी परिसरात काल संध्याकाळी वादळामुळे विजेची एक जिवंत तार तुटून रस्त्यावर पडली होती. रात्री या परिसरात सायकलने जाणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रभाकर शिरसागर (52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चिमूर तालुक्यातील हिवरा येथे वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. विकास ढोरे (45) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. शेतात मेंढ्या चराई करत असताना संध्याकाळी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.



