सोलापूर

धक्कादायक! सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू

  • आज सोलापूर शहरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथे दोन शाळकरी मुले दगावली आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भाग्यश्री म्हेत्रे (16), जिया महादेव म्हेत्रे (16) असे मृत्युमुखी पावलेल्या मुलींची नावे आहेत. तर जयश्री महादेच म्हेत्रे (18) हिची परिस्थिती गंभीर आहे.
  • नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉ.अमित मंचले यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध निवेदने दिले, तक्रार व हरकती दिल्या. तरीही सर्रास पालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक केली. परिणामी आज बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथील दोन शाळकरी मुलांना दुषित पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला. याला सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. याचा जाहीर निषेध करण्यात आला.
  • यासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने राज्य समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉ. अमित मंचले व नागरिक उपस्थित होते. 
  • यावेळी ॲड. अनिल वासम म्हणाले की, दूषित पाण्यामुळे दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी, नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व मोफत औषधोपचार द्यावे, स्वतंत्र पाण्याचे व ड्रेनिजची लाइन करावे, ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली अशा संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तत्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करावे, अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरून व्यक्त होईल, असा इशारा ॲड. वासम यांनी दिला.

Related Articles

Back to top button