क्राईम
संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या?

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे प्रकरणात नवी गुंतागुंत निर्माण झाली आहे. देशमुख यांना कथितरित्या एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तिचा मृतदेह कळंब शहरातील तिच्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला असून ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
- कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील एक महिला (जी मनिषा बिडवे, मनिषा आकुसकर, मनिषा बियाणी, मनिषा गोंदवले अशा विविध नावांनी ओळखली जात होती) मागील काही वर्षांपासून एकटीच राहत होती. २७ मार्च रोजी तिच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. घराला बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी मागच्या बाजूने घरात प्रवेश केला असता त्यांना किचनमध्ये महिलेचा मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह ५ ते ६ दिवसांपासून घरात पडून असावा, असा अंदाज आहे. मृतदेहाच्या डोक्याला मार लागल्याच्या खुणाही आढळल्या आहेत.
- या महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे धागेदोरे आता गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडले जात आहेत. अशी जोरदार चर्चा सुरू आहे की, हीच ती महिला होती जिला देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केले जात होते. ती देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या संपर्कात होती आणि हत्या झाल्यानंतर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती, असे म्हटले जात आहे.
- या महिलेची देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी चौकशी झाली होती, अशीही चर्चा आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा काही धागेदोरे मिटवण्यासाठी तिची हत्या करण्यात आली असावी, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.



