ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात राजकीय पक्षांच्या जाहिराती सुरू आहेत. यातील ठाकरे गटाने महिला अत्याचारासंबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधील कलाकार पॉर्नस्टार असल्याचे सांगत भाजपाने या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कलाकाराचा फोटो दाखवत ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल केला आहे.
ठाकरे गटाने राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न आणण्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार केला आहे. सध्या ठाकरे गटाच्या ज्या जाहिराती येत आहेत. या जाहिरातीमधील जे पात्र आहे, ते पॉर्नस्टार आहे. अदुबाळ नाईट लाइफ प्रॉडक्शनने ज्या जाहिराती बनवल्या आहेत, त्यातील पात्र पॉर्नस्टार आहे. हाच पॉर्नस्टार जाहिरातीत विचारतो की, महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? आणि हाच पॉर्नस्टार लहान वयाच्या मुलींबरोबर अश्लिल चित्रीकरणही करतो, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
हा जो कोण व्यक्ती आहे, याच व्यक्तीचे एका मोबाइल अॅपवर घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडिओ आहेत. असे बाप जाहिरातीत टाकून आपण बाप असल्याचे ते महाराष्ट्राला दाखवणार आहेत का? असा सवाल वाघ यांनी विचारला आहे.



