माझे शेवटचे तोंडही बायकोला दाखवू नका

एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिलानंद हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते.
माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असे तेलगोटे म्हणाले होते. पोलिसांनी शिलानंद यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
या पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असेल. पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे. तेलगोटे यांच्या व्हॉटसॲपवर स्टेटसवरून आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे.
मी शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा). मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला माझ्या मुलासमोर खूप अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे, असे सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती.
सदर रक्कम मी लोन म्हणून काढली असून त्याचे व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझे पोस्टमार्टेम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये.
कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेले नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिले तरी चालेल… कारण माझी पत्नी… असे त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटले आहे.



