मनोरंजन
‘छावा’ च्या दमदार यशानंतर आली आणखी एक Good News

- अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. शिवाजी सामंत यांनी लिहिलेल्या ‘छावा’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ज्या मराठी पुस्तकावर आधारित आहे, त्याबद्दलही देशभर उत्सुकता निर्माण झाली आहे.
- या कादंबरीवर आधारित बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गेली चाळीस दशके मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही कादंबरी त्यामुळे अमराठी वाचकांच्याही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देत मेहता पब्लिशिंग हाऊसने छावा कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे. शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी हे भाषांतर केले आहे.
- ‘छावा’ च्या यशानंतर देशातील आणि अगदी जगातील कोपऱ्यातूनही या कादंबरीबद्दल विचारणा होऊ लागली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने यापूर्वीच या कादंबरीच्या इंग्रजी भाषांतराच्या कामास सुरुवात केल्याने चित्रपटाचा मुहूर्त साधत ‘छावा’ ची इंग्रजी आवृत्ती बाजारात उपलब्ध करणे शक्य झाले असल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता यांनी सांगितले.
- मागील महिन्याभरात छावा कादंबरीची मागणी प्रचंड वाढल्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊसने या कादंबरीची पेपरबॅकमधील विशेष आवृत्तीही प्रकाशित केली आहे. याशिवाय हिंदी प्रकाशकांनीही विशेष आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यामुळे ‘छावा’ कादंबरी वाचकांना आता विविध भाषांमध्ये नव्या ढंगात अनुभवायला मिळणार आहे.



