महाराष्ट्र
त्यांना कदापि माफी नाही!

- नागपूर शहरात सोमवारी रात्री मोठा राडा झाला. दोन्ही गटात दंगल उसळून जोरदार दगडफेक झाली. या सगळ्या घडामोडींत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे. नागपुरातील घटनेत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्या कुणालाच सोडणार नाही, असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला.
- फडणवीस आज विधिमंडळ सभागृहात बोलत होते. ते पुढे म्हणाले, काल नागपूर शहरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव अशा घोषणा देत आंदोलन केले. आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. यानंतर सायंकाळी अफवा पसरली गेली. यानंतर नमाज आटोपून येत असलेल्या दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव जमला. घोषणा देऊ लागला. यानंतर या लोकांनी आग लावून टाकू, असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.
- याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची तक्रार द्यायची असे सांगितले होते. त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे हंसापूरी भागात काही लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला.
- सकाळी घटना घडल्यानंतर मधल्या काळात शांतता होती. पण संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचे लक्षात येत आहे. कारण एक ट्रॉली भरून दगड मिळालेले आहेत. शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात होते. हे शस्त्र आता जप्त करण्यात आले आहे. वाहनांची जाळपोळ झाली. काही ठराविक घरे आणि कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले.
- तीन डीसीपी लेव्हलचे लोक जखमी झालेत. यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसून येत आहे, अशा लोकांवर कारवाई केलीच जाईल. कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडले जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.