महाराष्ट्र
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा मोठा निर्णय

- राज्यात सध्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन देखील करत आहेत. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचे महिमामंडण कधीच होणार नाही, असा शब्द फडणवीस यांनी दिला आहे. तर औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचे संरक्षण असल्याचे देखील त्यांनी सांगितले. केंद्राने संरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रालाही संरक्षण देणे भाग असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
- फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रात कशाला हवी? परंतु आपल्याला देखील कल्पना आहे. एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर येवून पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले. त्याच्या कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागत आहे, असे देखील फडणवीस म्हणाले.
- परंतु यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक शब्द दिला. काहीही झाले तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचे उदात्तीकरण करण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.