क्राईम
आई, दीदीच्या शरीराचे दोन तुकडे झालेत

- पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर खड्डे पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा एक हृदयद्रावक अपघात झाला. या अपघातात २१ वर्षीय गजल तुटेजा या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्कुटीवरून जात असताना ती एका डंपरच्या चाकाखाली आली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की गजलच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते.
- ठाण्यातील घोडबंदरवर कॅडबरी जंक्शनजवळ ही घटना घडली आहे. गजल तुटेजा ही घोडबंदर परिसरातील एका सोसायटीत राहत होती आणि एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. वडील नसल्याने घराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. आई आणि लहान भावाचा आधार असलेल्या गजलने नोकरीसह पोळी-भाजी विक्री करून घर चालवले होते. तिचा लहान भाऊ अक्की हाच तिचा जीव होता.
- रविवारी रात्री दहा वाजता गजल ही पेट्रोल पंपाजवळून स्कुटीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तिचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि ती थेट डंपरखाली गेली. डंपरच्या चाकाखाली आल्याने तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर कुणालाच तिच्या मृतदेहाजवळ जायची हिम्मत होत नव्हती. आई दीदीच्या शरीराचे दोन तुकडे झालेत, असे भावाने सांगताच आई धावत गेली. तिची आई आणि भाऊ घटनास्थळी आले आणि आईने चादरीत गुंडाळून गजलचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला.
- गजलने अपघाताच्या काही मिनिटे आधीच आपल्या भावाला “मी दोन मिनिटांत खाली येते, आपण बाहेर जेवायला जाऊ” असे सांगितले होते. पण तिच्या भावाला रस्त्यावर गर्दी दिसली आणि तीच बहिण अपघातात मृत झाल्याचे पाहून तो जागीच कोसळला.



