क्राईम
प्रियकरासाठी दीपाने पतीलाच ठार मारले

- पती-पत्नीचे नाते हे विश्वासाचे, आपुलकीचे आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देणारे असते; मात्र अनैतिक प्रकरणात गुरफटल्यानंतर त्यांच्यात दरी निर्माण होते. त्यातून भांडण, मारहाण सुरू होते.
- एकमेकांचा जीव घेण्यासाठी धजावतात. लातूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात धरणगुत्ती येथे असाच प्रकार घडला.
- प्रियकराला कवटाळण्यासाठी पत्नीच कुंकवाची वैरी ठरली. पतीला ठार मारून मृतदेह स्मशानभूमीत पुरला, मात्र नातेवाईक व पोलिसांच्या दक्षतेमुळे या खुनाला वाचा फुटली आणि पत्नी, तिचा प्रियकर व अन्य दोघे अशा चौघांच्या हातात बेड्या पडल्या.
- धरणगुत्तीमध्ये राहणारे संजय शिकलगार व त्यांची पत्नी दीपा शिकलगार यांचा संसार अगदी सुखाने सुरू होता.
- संजय हा गवंडी काम करून कुटुंबाला काहीच कमी पडणार नाही, याची काळजी घेत होता. त्यांना तीन मुले आहेत. मुलेही शिक्षण घेत आहेत. संजय कामानिमित्ताने गोव्याला गेल्यानंतर दोन ते तीन महिने गावी यायचा नाही, पत्नीला पैसे पाठवून देत होता. दीपाही मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होती.
- मात्र, पतीच्या अनुपस्थितीत तिचे दर्शन कांबळे नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. पतीपेक्षा दीपा दर्शनवर माया करू लागली. दरम्यान गावी आल्यानंतर संजयला पत्नीचे खरे रूप समजले.
- त्यामुळे त्याने दीपाला खूप समजावून सांगितले. मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामाची माहिती दिली, पण दीपा ऐकून घेण्याच्या पुढे गेली होती. प्रियकरासाठी पतीला सोडण्यास ती तयार होती, यामुळे कौटुंबिक कलह वाढले.
- २७ फेब्रुवारी २०२५ रोजी दीपाने गोड बोलून पती संजयला गावापासून दूर असलेल्या माळभागात नेले. तेथे दर्शन व त्याचे दोन नातेवाईक थांबले होते. या चौघांनी संजयला समजावून सांगितले.
- ‘तू आमच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरलास, तर तुला ठार मारीन’ असे दर्शन म्हणाला. यावेळी शाब्दिक वाद झाल्यानंतर दर्शनने कोयत्याने संजयच्या डोक्यात, मानेवर वार करून त्याला ठार मारले. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह पुरला.
- खून करणारे कितीही हुशार असले तरी पोलीस संशयिताचा शोध घेतातच. याप्रमाणे पोलिसांना गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर दीपा, तिचा प्रियकर दर्शन कांबळे, मदत करणारे स्वागत कांबळे, अमृत कांबळे या चौघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तोंड उघडले आणि खुनाची कबुली दिली.