क्राईम

बाईकचा धक्का लागला; पुढे डोक्यात वार करत तरुणाला संपवले

  • बाईकचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ मिश्रा (वय-२६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 
  • याप्रकरणी आरोपी कौशिक चौहान, त्याचा भाऊ अजय चौहान, वडील अवधेश चौहान, आई सुनीता देवी चौहान आणि मित्र सुनिल सोनवणे या पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तुळींज पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
  • अधिक माहितीनुसार, नालासोपारा शेरा सर्कल परिसरात राहणारा तरुण सौरभ व त्याचे मित्र त्यांचा मित्र विवेक गुप्ता याचा वाढदिवस असल्याने मध्यरात्री केक कापून सेलिब्रेशन करणार होते. सचिन शर्मा, विवेक गुप्ता, सोनू खान आणि सौरभ मिश्रा हे सर्व मित्र त्यांचा एक मित्र नालासोपारा येथील संतोषभवन परिसरात राहत असलेल्या मित्राला बाईकवरून घेण्यासाठी जात होते. मोचीपाडा परिसरात अजय चौहान (वय -२०) आणि कौशिक चौहान (वय-२१) यांना सौरभच्या बुलेटचा धक्का लागला. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. दोघांनी सौरभला मारहाण करण्यास सुरुवात केली.
  • त्यानंतर चौहान यांचे आई वडिल, मित्र सुनिल सोनावणे त्या ठिकाणी आले व त्यांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. सौरभसोबत असलेल्या मित्रांनी ही वादावादी, मारहाण मध्यस्थी करत थांबवली. सौरभ व त्याचे मित्र दुचाकीवरून त्या ठिकाणाहून निघून जात असतानाच कौशिक चौहान त्याच्या घरातून लोखंडी सळई घेऊन बाहेर आला आणि सौरभच्या डोक्यात त्याने सळईने वार केला.
  • यात गंभीररित्या जखमी झालेला सौरभ रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. डोक्यात सळईने वार केल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या सौरभ याचा आचोळे येथील आयकॉन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button