गज्या मारणे गँगची पुणे पोलिसांनी काढली धिंड

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी याबाबत पुणे पोलिसांवर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पुणे पोलीस सक्रिय झालेले दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरुड परिसरातून धिंड काढण्यात आली.
धिंड काढण्यात आलेले आरोपी हे कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील सदस्य आहेत. या गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने व आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांकडून ही धिंड काढण्यात आली आहे. ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावे आहेत. पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर अद्याप एक जण फरार आहे. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण जोग हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे.
त्यानंतर मंत्री मोहोळ पुण्यात आल्यानंतर त्यांनी जोग या तरुणाची घरी जाऊन भेट देखील घेतली होती. तसेच पुणे पोलिसांची कानउघाडणीही केली होती. गज्या मारणे टोळीवर मोक्का लावण्यात आला असून टोळी प्रमुख मारणे याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. टोळीला नेस्तानाबूत करण्याची पोलिसांची भूमिका असून कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआरकडून तर त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.



