स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार

सोलापूर (प्रतिनिधी) स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित महिलांना ताब्यात घेतले.तसेच मसाज सेंटरच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मसाज सेंटरचे मालक अक्षय संजय होळकर (वय- 32, रा.उत्तर कसबा) व श्रीनिवास शंकर गुडूर (वय-32) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहितीनुसार, एक्वा फॅमिली स्पा द स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स गाळा नंबर 9 जुनी मिल कंपाऊंड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने 21 फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा मसाज सेंटरमध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
याप्रकरणी पोलीस नाईक अ. सत्तार पटेल यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून करण्यात येत असून न्यायालयाने आरोपींची गुन्ह्याच्या तपासाकामी 25 फेब्रुवारीपर्यंत कस्टडी रिमांड दिली आहे.