महाराष्ट्र

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरला वेग

  • राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजपकडून करण्यात येत आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या भरवशावर उभ्या असलेल्या केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ठाकरे गटाच्या खासदारांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरला वेग आला असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे चार खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
  • ठाकरे आणि खासदार संजय राऊत ज्या एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवतात. त्यांच्या पक्षाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला चक्क ठाकरे गटाचे खासदार हजेरी लावतात. होय हे खरं आहे. शिंदे गटाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित होते. खरंतर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार संजय (बंडू) जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.
  • विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे खासदार लवकरच फुटणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तातडीने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेस लोकसभेतील आठ खासदार उपस्थित होते. संजय दिना पाटील गैरहजर होते. यावेळी सावंत यांनी टायगर अभी जिंदा है, आमची एकीची वज्रमूठ आहे, असे सांगितले होते.
  • आता त्यांच्या या घोषणा कागदावरच राहिल्याचे सिद्ध झाले आहे. कारण याच आठ खासदारांतील तीन खासदार चक्क शिंदे गटाच्या खासदारच्या स्नेहभोजनाला हजर होते. या राजकारणाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आजच माजी आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या धक्क्यातून सावरत असतानाच शिंदे गटाचे डिनर पॉलिटिक्स समोर आले आहे.

Related Articles

Back to top button