फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून तरुणाला मारहाण
![](https://solapurviralnews2.com/wp-content/uploads/2025/02/krushna-andhale-beed-sarnpancha_2025011370535.jpg)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. याप्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. फरार आरोपी आंधळेच्या मित्रांकडून एका तरुणाला मारहाण झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर बीडमधील दहशत अजूनही कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. जखमी तरुणाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणाने देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत. मारहाण करणाऱ्या दोघा जणांवर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेत धारुर पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
अशोक शंकर मोहिते हा युवक मोबाइलवर देशमुख हत्याकांडाच्या बातम्या पाहत होता. याच दरम्यान दोघा जणांनी आमच्या बातम्या का पाहतोस असे त्याला विचारले. तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू, अशी धमकी या दोघांनी दिली. त्यानंतर या तरुणाला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांकडून या दोघा जणांचा शोध घेतला जात आहे.