क्राईम
राज्यात पुन्हा ‘सैराट’!
- पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून विवाहितेला तिच्या चिमुकल्या मुलासह साखळदंडानी दोन महिने बांधून ठेवल्याचा मन सुन्न करणारा प्रकार जालना जिल्ह्याच्या भोकरदन शहराजवळील आलापूर गावात घडला आहे. गावातील एका तरुणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या आई-वडिलांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे.
- पीडित महिला लग्नानंतर पाच वर्षांनी आपल्या बहिणीला भेटायला माहेरी आली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यासह तिच्या लहान बाळालाही साखळदंडांनी बांधून घरात डांबून ठेवले. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन महिने दोघांना घरात डांबून ठेवण्यात आले होते. आता पोलिसांनी दोघांची सुटका केली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार शहनाज उर्फ सोनल आणि मुलगा कार्तिक अशी सुटका करण्यात आलेल्याची मायलेकराची नावे आहेत.भोकरदन शहराजवळ असलेल्या आलापूर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल ही छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मिसाळवाडीमध्ये राहत असताना तिने तेथे राहणाऱ्या सागर संजय ढगे या तरुणासोबत पळून जाऊन आंतरधर्मीय विवाह केला. मुलीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर शहा कुटुंबीय आलापुर येथे परत आपल्या मूळ गावी आले. दोघांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली होती. या दाम्पत्याला तीन वर्षाचा कार्तिक नावाचा मुलगाही आहे.
- दोन महिन्यापूर्वी पीडित महिला बहिणीला बाळ झाल्याने त्याला पाहण्यासाठी माहेरी गेली होती. पण आंतरधर्मीय लग्न केल्याचा मनात राग धरून विवाहितेच्या आई वडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवाला दोन महिने घरात डांबून ठेवले. सागर त्याच्या पत्नीला घेण्यासाठी गेला असता तुझा आणि आमचा धर्म वेगळा असून आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात पुन्हा दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणत सागरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला हाकलून दिले.
- मुलीला व नातवला लोखंडी साखळीने बांधून ठेवले. पत्नीसह मुलाला अशाप्रकारे सासुरवाडीच्या लोकांनी डांबून ठेवल्यानंतर पीडित विवाहितेच्या पतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने पीडित तरुणाची सर्व बाजू ऐकून भोकरदन पोलिसांना विवाहितेची सुटका करून तिला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.
- न्यायालयाच्या आदेशाने भोकरदन पोलीस आलापूर येथील खालिद शहा यांच्या घरी गेले. मात्र, त्यांना शहनाजच्या आईने कोणताही थांगपत्ता लागू दिला नाही. यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवून थेट घरामध्ये घुसून शहनाज व कार्तिक यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांना कुटुंबाच्या विरोधाचा सामना करावा लागला. मात्र पोलिसांनी बळाच्या जोरावर मायलेकाची सुटका केली. शहा कुटूंब कोणाशी बोलत नव्हते व लोकांत मिसळत नव्हते. या विक्षिप्तपणामुळे शहनाजची काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवून त्यांची सुटका केली. तसेच शहनाज व कार्तिकला सागरच्या स्वाधीन केले.