मी देखील आता सर्व उघड करतो

फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार, हे मला माहिती होते. जी चौकशी करायची ती करा. आंदोलनावेळी मला सर्वात जास्त फोन फडणवीस यांचेच आले आहेत. तुम्ही माझ्यासोबत काय बोललात हे सगळे मी सांगणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. एसआयटी चौकशीच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून दोन्ही सभागृहांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला जरांगेंच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावर पाटलांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस हे शंभर टक्के सत्तेचा वापर करत आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. कारण मला माहितीये माझा कुठेच दोष नाही. मी प्रत्येक चौकशीला समोरा जाण्यासाठी तयार आहे. चौकशीमध्ये फडणवीसांचे जास्त कॉल रेकॉर्डींग असतील. त्यामुळे ते यात काय काय बोलले, हे सर्वकाही समोर येईल, अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे. तुम्ही आता जरी चौकशीला सुरूवात केली तरी मी तयार आहे. हातला लावलेल्या सलाइन सकट मी चौकशीसाठी उभा राहीन , अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे.