सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणाऱ्या पत्रकारांचा अजितदादांनी घेतला समाचार
शेतकरी कर्जमाफीला विरोध करणाऱ्या बातमीवरून अजितदादांचा आवाज काहीसा वाढलेला दिसला. यावेळी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणाऱ्या पत्रकारांचाही अजितदादांनी त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला. यावेळी दादांनी हे सूत्र मला एकदा पाहायचेच आहेत, मी म्हणतो सूत्रांना एखादा जीवन गौरव पुरस्कार देऊनच टाका. हे सूत्र माझ्या हातात सापडू द्या, त्याचा पुरेपूर बंदोबस्त करतो, असा दमही अजित पवारांनी भरला. ते आज पुण्यात बोलत होते.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तुम्ही विरोध केल्याचे वृत्त समोर आले होते, असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच अजितदादांचा आवाज काहीसा वाढला. ते म्हणाले की, कर्जमाफीबाबत चुकीची बातमी दिली गेली कर्जमाफी देऊ नका असे मी कधीच म्हणणार नाही. कारण आम्ही शेतकरी आहोत. ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल, अशा सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे ही बातमी धादांत खोटी असल्याचे म्हणत हे सूत्र मला एकदा पाहायचेच आहेत, मी म्हणतो सूत्रांना एखादा जीवन गौरव पुरस्कार देऊनच टाका. असे म्हणत उगीच चुकीच्या बातम्या लावल्या जातात, असे अजितदादा म्हणाले.