ब्रेकिंग! अजितदादांकडून सोलापूरकरांना खुशखबर

- सोलापूर :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा 267 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातील सुमारे 90 कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिली.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, शहर पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, एमजीपीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून 170 दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी 894 कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे. या अंतर्गत कामे सुरू आहेत. राज्य शासनाचा 267 कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून, त्यातील पहिला टप्पा सुमारे 90 कोटी पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील. तरी महापालिकेने या अनुषंगाने पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.