- अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट महायुतीत सामील झाला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. संख्याबळाच्या जोरावर शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष मिळाला. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतर ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेशाबाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार शिंदे गटात जाऊ शकतील, अशीही माहिती मिळत आहे. या सहा खासदारांमध्ये पाच खासदार ग्रामीण भागातील तर एक खासदार मुंबईतील असल्याची माहिती आहे.
- शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. आज पक्षप्रवेश होणार होता. मात्र तो कायदेशीर कारणामुळे टाळण्यात आला असून तो पुढे होणार आहे, अशीही माहिती मिळत आहे.
- आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. याच कार्यक्रमाच्या मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश होणार होता, मात्र कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आजचा पक्षप्रवेश टाळला आहे. उद्या अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
शिंदेंचे राज्यात ‘ऑपरेशन टायगर’, ठाकरेंचे सहा खासदार फुटणार?
