मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौ-यात महाराष्ट्रासाठी खुशखबर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक खेचून आणली आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे करार केले आहेत.
एकाच दिवसात इतक्या मोठ्या रकमेचे करार करणे हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासाठी गुंतवणूक करार होणार आहेत. फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी त्यांना निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह महाराष्ट्रात 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची फडणवीस यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले आहे. तसेच रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली आहे. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.
रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात 15,000 मेवॉ पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
त्याबरोबरच शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.