क्राईम
शिक्षक दाम्पत्याने संपवले जीवन

- सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ताणतणावाचे प्रमाण वाढून नागरिक तणावग्रस्त दिसत आहेत. दरम्यान, कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून शिक्षक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी (वय 24) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या शिक्षक दांपत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.
- चिराग यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते. त्यांच्या पत्नी प्रा .पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.
- बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व प्रा. पल्लवी हे बाईकवरून येथील वारूळवाडी-ठाकरवाडी रस्त्यावरील डिंभे डावा कालव्यावरील पुलावर आले होते. त्यांनी बाईक पुलावर उभी केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. मात्र, कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणातच ते दिसेनासे झाले.



