संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आक्रमक असलेले आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली.
त्यांना फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राज्यात सध्या चर्चा होत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंड वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केले आहे. त्याला बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकीलांनी हा खटला लढण्यास नकार दिला. त्यांनी माघार घेतली. या सरकारी वकीलांवर कारवाईची मागणी धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
फडणवीस यांनीही सांगितले की, आमदार धस यांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी निवेदन दिले. उज्ज्वल निकम यांच्यासोबत बोलणे झाले आहे. ते लवकरच त्यांचा निर्णय कळवतील.



