राजकीय
दीडशे मतदारसंघात घोळ, अजितदादांचाही पराभव

- महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. अनेक दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले. या अनपेक्षित निकालाने विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मतदान टळले. यानंतर आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे. निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे.
- सखोल चौकशी केल्यास अजितदादाही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते असा धक्कादायक आरोप जानकर यांनी केला आहे. आमदार जानकर यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. जानकर पुढे म्हणाले, ज्या बूथवर मला 31 मते मिळाली तेथील लोकांनी चारशे मते दाखवली आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. जवळजवळ दीडशे मतदारसंघांत गडबड झाली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजितदादाही बारामती मतदारसंघात 20 हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते.
- अजितदादा यांना एक लाख 80 हजार मते मिळाली आहेत. त्यापैकी दोनास एक सूत्र वापरले गेले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांना 80 हजार अधिक 60 अशी एक लाख 40 हजार मते मिळाली असून अजितदादा यांना एक लाख 20 हजार मते उरतात, असे गणित जानकर यांनी मांडले.



