सोलापूर
सोलापुरात अजब घटना

सोलापूर (प्रतिनिधी) पत्नीने पतीचा नंबर ब्लॉक केल्याने पत्नीची दुचाकी जाळल्याप्रकरणी पतीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गीतांजली गोपाल द्यावरकोंडा (वय-४२,रा. साहेबराम अपार्टमेंट चौथा मजला,दत्तनगर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती गोपाळ रामकृष्ण धावरकोंडा (रा. रविवार पेठ,राजेंद्र चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गीतांजली या नेमचंद जैन आयुर्वेदिक रुग्णालय येथे डिलिव्हरी वार्ड येथे असताना त्यांचे पती गोपाळ हा तेथे येऊन तू माझा नंबर ब्लॉक का केला, असे म्हणत दुचाकी मागितली. त्यावेळी पत्नीने दुचाकी देण्यास नकार दिला असता गोपाळ याने पेट्रोलची बाटली दाखवत जाळून टाकतो अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी गीतांजली यांनी तेथील वॉचमनला सांगून गोपाळ याला बाहेर जाण्यास सांगितले असता गोपाळ यांनी खाली गेल्यावर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली फिर्यादी यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून जाळली व फिर्यादीस तुझी गाडी जशी जाळली आहे.
तसेच तुला पण मारून टाकतो, असे म्हणाला. त्यानंतर मी तुला व तुझ्या बापाला रस्त्यावर आणून जाळल्याशिवाय गप्प बसणार नाही. यापुढे नोकरी कशी करते मी बघतो असे म्हणत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक कामूर्ती हे करीत आहे.



