क्राईम
मोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेला 19 दिवस उलटून गेले तरी आरोपी मोकाटच आहेत.
याच घटनेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा निघणार आहे. मात्र या मोर्चाआधीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अतिशय खळबळजनक दावा केला आहे.
काल रात्री त्यांना एक फोन आल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. त्या फोनवर सदरील व्यक्तीने उर्वरित तिन्ही आरोपींचा खून झाल्याचे सांगितले. त्या आरोपींचे मृतदेह कुठे आहेत हे देखील त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला आहे.
देशमुख यांचे अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. तरी देखील मारेकऱ्यांना गजाआड करता आलेले नाही.



