सोलापूर
मोबाईल चोरट्यांना सोलापूर पोलिसांचा दणका
- सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसापासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. यात शहरातील विविध पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या मोबाईल चोरांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे 32 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले. तसेच एक घरफोडीचा असे एकूण पाच गुन्हे शहर गुन्हे शाखाकडून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
- दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकास शहरातील मोबाईल फोनची जबरीने चोरी करणार्या गुन्हेगारांची व गुन्ह्यांची माहिती घेताना एमआयडीसी पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे येथील दोन व जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील याप्रमाणे चार गुन्ह्यात मोबाईल जबरदस्त हिसका मारून चोरी केलेल्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली. याबाबत अधिक माहिती घेताना संशयित आरोपी शंकर चंदुरसिंग मैनावालेे (वय-25, रा. अडकी हॉस्पिटलच्या पाठीमागे,आर.के. स्टुडिओच्या बोळात,बेडर पूल),महेश हनुमान मौलावाले (वय-23, रा.महात्मा फुले नगर, सिद्धार्थ चौक, कनक अपार्टमेंटच्या समोर), अजय मनोज जमादार (वय-23,रा. जय भारत शाळेच्या पाठीमागे, बापूजी नगर) यांनी सदरचे गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली.
- त्यानुसार संशयित आरोपी महेश मौलावाले व शंकर मैनावाले यांना ताब्यात घेतले.दोन्ही आरोपींकडून वर नमूद गुन्ह्यातील चोरलेल्या 32 हजार किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले.तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विजय विष्णू कांबळे (वय-23,रा.हब्बु वस्ती) व सचिन शंकर कदम (वय-46,रा. लक्ष्मी विष्णू चाळ, महादेव मंदिर जवळ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीचे पितळी हंडे, तांब्याचे पातेले व इतर साहित्य असा अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- तसेच विकी किशोर फटफटवाले (वय-22,रा.बालाजी मठ जवळ 137,लोदी गल्ली,उत्तर सदर बझार) हा चोरी केलेला मोबाईल विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडून आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल सात रस्ता येथील सुधा इडली गृह येथे चोरी केल्याचे त्याने सांगितले.