ब्रेकिंग! माझ्या मुलाचा मर्डर केला, सोमनाथच्या आईने मांडली व्यथा
जेष्ठ नेते शरद पवार यांनी परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी दोषींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईने केली आहे. तर, दोषींवर सक्त कारवाई होईल, हे सरकारपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आमची राहिल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिलेआहे.
सोमनाथ यांच्या आई म्हणाल्या, माझ्या मुलाचा मर्डर केला. जीव घेतला. पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केला. जे-जे दोषी असतील, त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. यापुढे कुठल्याही गरीबावर असा अत्याचार आणि अन्याय होऊ नये.
यानंतर पवार म्हणाले, जे काही घडले, ते धक्कादायक होते. विधानसभेत अनेकांनी परभणीचा प्रश्न मांडला. ज्या तरूणाला पोलिसांनी मारहाण केली, त्याचा गुन्हा काय होता, असे दिसत नाही. रस्त्यावर आलेल्या लोकांना मारहाण करणं, हे काय योग्य नाही.
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना कोंबिंग ऑपरेशन करून ताब्यात घेणे चूक आहे. खरी वस्तुस्थिती समजल्यानंतर सरकारशी बोलता येईल, या हेतूने परभणीत आलो आहे. तुमचे मत योग्य ठिकाणी पोहचवू. जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, ही कुटुंबाची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची राहिल, असे पवार यांनी म्हटले आहे.