ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी
जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना घोषित केली. त्याअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना शासनाकडून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात.
गेल्या पाच महिन्यात अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजेनचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यात आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत. तसेच आमचे सरकार पुन्हा निवडून आल्यास या योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ, असे महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगण्यात आले.
या योजनेचा कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आणि महायुतीला भरघोस मतदान करत त्यांना पुन्हा निवडून दिले. मात्र या योजनेची अंमलबावणी करण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या, त्या ‘लाडक्या बहिणींचे’ अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र त्यांच्या मोबदल्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रती अर्जामागे पन्नास रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र ही योजना सुरू होऊन चार महिन्यांहून अधिक काल उलटून गेला, तरी अजूनही तीन हजाराहून अधिक अंगणवाडी सेविकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. इतके महिने उलटूनही मोबदल्याचे पैसे न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.