भाऊजी सारखा मेव्हणीकडे करायचा मागणी
एका व्यक्तीने आपल्या मेव्हणीचा चाकूने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूरमध्ये घडली आहे. अंशुल असे आरोपीचे नाव आहे. लाला तेली बजारिया परिसरातील आयटीआय कॉलनीमध्ये ही घटना घडली. आरोपी आपल्या भावाचे आणि मेव्हणी कोमलचे लग्न लावण्यास इच्छुक होता. पण, कोमलने या लग्नाला नकार दिला होता.
आरोपी अंशुल याचा कोमलची मोठी बहिणी वर्तिकाशी प्रेमविवाह झाला आहे. कोमलच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वेळी घर बांधण्यासाठी अंशुलला सहा ते सात लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करावे लागू नयेत म्हणून आरोपी आपल्या भावाचे आणि मेव्हणी कोमलचे लग्न लावण्याच्या विचारात होता. मात्र, कोमल आणि तिचे कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास कोमल ट्युशनवरून घरी परतली होती. अंशुल त्याच गल्लीमध्ये राहत होता. तो कोमलचा काटा काढण्याच्या उद्देशाने घराबाहेर बसला होता. कोमलची आई बाजारात गेल्यानंतर कोमल घरात एकटीच होती. आरोपी घरात घुसला आणि कोमलवर चाकूने अनेक वार केले. गुन्हा केल्यानंतर अंशुलने चाकू स्कार्फमध्ये गुंडाळून पलंगावर टाकला आणि रक्ताने माखलेले हात धुतले. या धडपडीत अंशुलच्या हाताला चाकू लागला होता. दरम्यान, अंशुलची सासू घरी आली. अंशुलच्या हाताला लागलेले रक्त पाहून तिने विचारपूस केली. त्यानंतर त्याने तिलाही आत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासूने आरडाओरडा केला त्यामुळे तो पळून गेला. घरात प्रवेश केल्यानंतर तिला आपल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
पोलिसांनी आरोपी अंशुलला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कोमलने आपल्या भावाशी लग्न करण्यास नकार दिल्याने आपण तिचा खून केल्याचे अंशुलने कबूल केले. या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहेत.