महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. नागपुरातील राजभवन परिसरात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी महायुतीच्या ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत अजितदादा यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अगदी जाहीरपणे केले. मीसुद्धा अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतो, असे अजितदादा म्हणताच उपस्थित खळखळून हसले.
शपथ घेतलेल्या आमदारांत भाजपचे १९, अजितदादा गटाचे ९ आणि शिंदे गटाच्या ११ आमदारांचा समावेश आहे. आता या मंत्र्यांना दोन दिवसांत खात्यांचे वाटप केले जाईल, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात दहा मंत्रिपदे मिळाली आहेत. विदर्भ उत्तर महाराष्ट्रात आठ मंत्रिपदे मिळाली आहेत. मागील शिंदे सरकारमधील एकूण १२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
तिन्ही पक्षांच्या या धक्कातंत्राने पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. यातच मंत्रिपदे अडीच वर्षांसाठीच असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यानंतर अजितदादा मुख्यमंत्री कधी होतील, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अडीच वर्षांचा धागा पकडत मी अडीच महिन्यांसाठीसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे अजितदादा यांनी म्हणताच जोरदार हास्यकल्लोळ उडाला.