सोलापूर
खासदार प्रणिती शिंदेंचा मोठा निर्णय
- नवी दिल्ली, – संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे संसदेच्या सभागृहामध्ये इंडिया आघाडीचे सदस्य केंद्रातील भाजप एनडीए सरकारला अनेक मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अदानी, ईव्हीएम मणिपूर वरून काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. तर राज्यसभेत उपराष्ट्रपती विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यासाठी इंडिया आघाडीने मोर्चे बांधणी केली आहे. यातच ईव्हीएमबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी नवी दिल्ली संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
- पुढे बोलताना खा. प्रणिती शिंदे म्हणाले की, आम्हाला संसदेचे कामकाज चालवायचे आहे. शून्य प्रहरात मणिपूर प्रश्नसंदर्भात चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. मणिपूरवासियांच्या मनात तीन प्रश्न आहेत एक म्हणजे पंतप्रधान मोदी मनिपुरला केव्हा जाणार, दुसरे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेला याबाबत निवेदन कधी देणार, आणि तिसरा प्रश्न म्हणजे मणिपूर बाबत चर्चा करायची नसल्याने सोरोस प्रकरणाची ढाल करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. हे तीन मुद्दे आम्ही मांडतो, जेव्हा भाजप खूप अस्वस्थ होते. भाजपला कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची नाही मग तो ईव्हीएमचा मुद्दा असो अदानीचा मुद्दा असो की मणिपूरचा मुद्दा असो त्यामुळेच भाजपला संसदेचे कामकाज चालवायचे नाही हेच यातून दिसून येते. तसेच ईव्हीएमबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. महाराष्ट्र आणि हरयाणातील निकाल ईव्हीएममध्ये फेरफार करून लागलेले आहेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ईव्हीएम मुख्यमंत्री आहेत. जनतेत नाराजी आहे. महाराष्ट्राचा इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की एखाद्या पक्षाला एवढा मोठा जनाधार मिळूनही जनता आनंदी दिसत नाहीत. ज्यांच्यासाठी मतदान केले ते निवडून न आल्याची खंत मतदारांमध्ये आहे, असा मोठा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.