ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंना मोठा झटका

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंना पहिला मोठा झटका बसला. शिंदेंचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाच्या प्रमुखपद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली.
चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठी मदत केली. परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा सुधारली होती. मात्र, आता चिवटे यांना पदावरून हटवून नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी जारी केले आहे. नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी होती.
शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांची जनसामान्यांचा नेता म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचा मोठा वाटा होता. शिंदेंनी मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले. चिवटे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी चिवटे यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. शिंदे यांचे निरोप घेऊन चिवटे अनेकदा जरांगे यांच्याकडे जायचे.
जरांगेंनी उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या, त्यात चिवटेंचा सहभाग होता. मात्र, आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे पद काढून घेण्यात आले आहे. हा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.



