क्राईम

भीषण अपघात! बस मार्केटमध्ये शिरली, अनेकांना चिरडले

मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसने अनेकांना धडक दिल्याने या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 ते 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर, कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक बंद आहे. दरम्यान, कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. त्यामध्ये बसचालक संजय मोरे हा १ डिसेंबर रोजी चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे वय 54 वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवलेले नाही. त्यामुळे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण? याचा पोलीस तपास सुरू आहे.

कुर्ल्यातील एलबीएस रोड हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. याच एलबीएस रोडवर हा भीषण अपघात झाला. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला. बेस्टच्या बसने मार्केटमध्ये घुसून रिक्षाला चिरडले. रिक्षाचा चक्काचूर झाला. यानंतर बसने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात सात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातानंतर जमावाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचे व्हिडीओद्वारे समोर आले आहे. अपघात घडल्यानंतर बसचालक मोरे याला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी धाडस दाखवत मोरेला बाहेर काढले आणि पोलीस स्थानकात घेऊन गेले.

Related Articles

Back to top button