महाराष्ट्र
शिंदेंनी पुन्हा सर्व बैठका रद्द केल्या, अजितदादा एकटेच दिल्लीला जाणार

- महायुतीचा मुख्यमंत्री कोण आणि शिंदेंच्या शिवसेनेची सरकारमध्ये भूमिका काय असणार, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने शांतपणे सरकारमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका आणि त्यांना कोणती मंत्रीपदे मिळायला पाहिजे याची चर्चा सुरु केली आहे. त्यासोबतच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांसोबतही भेटीगाठी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजितदादा यांची एकमताने निवड झाली आहे. त्यानंतर आता अजितदादा आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.
- दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक करुन मागील आठवड्यात महाराष्ट्रात परतले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शिंदे त्यांच्या मुळगावी दरे येथे गेले. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते हवा पालटासाठी दरे गावी गेल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. रविवारी रात्री शिंदे ठाण्यातील निवासस्थानी आले. आज त्यांची शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठक होईल, असे सांगण्यात आले, मात्र अचानक शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
- महायुतीतील तिसरा प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे सत्तेत सहभागी होण्याची जय्यत तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार विजयी झाले आहेत. अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाली, त्याच दिवशी त्यांच्या पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.



