६३ मतदारसंघात ईव्हीएम हॅक करू, ५४ कोटी रुपये लागतील

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात. त्यातच सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील व्यक्ती ईव्हीएम मशिन हॅक करुन एका राजकीय पक्षाच्या बाजुने निवडणुकांचा निकाल फिरवू, असा दावा करत आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, आता या व्हिडिओवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच याप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचेही सांगितले आहे.
या व्हायरल व्हिडिओत हॅकरने दावा केला आहे की, तो अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक करू शकतो. यासाठी त्याने 54 कोटी रुपयांची मागणी केल्याचे व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.
दोन व्यक्तीमधील या संभाषणात 105 पैकी 63 उमेदवारांना जिंकवून देण्याबाबत चर्चा होत आहे. कथित हॅकरचे म्हणणे आहे की, उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्हाला व्हीव्हीपीएटी मशीन क्रमांक आवश्यक असेल. तसेच 288 मतदारसंघापैकी 281 ठिकाणी हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन आणि फिल्डवर काही माणसे लागतील, असे हॅकर सांगतो.
दरम्यान, यावर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. व्हिडिओमध्ये केलेले दावे निराधार, खोटे आणि अप्रमाणित आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम हे टॅंपरप्रुफ आहे, नेटवर्कसोबत ती जोडली जाऊ शकत नाही, असेही आयोगाने सांगितले.