ब्रेकिंग! सोलापुरात राजकीय भूकंप

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी अक्षरश: रांग लागली आहे. रोज नवनवे नेते पवारांना भेटत आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज पवार यांची भेट घेऊन तुतारी हाती घेण्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली.
ढोबळे हे सोलापूरचे माजी पालकमंत्री आहेत. पवार यांचे ते सुरुवातीपासूनचे सहकारी होते. २०१९ च्या निवडणुकीच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, हा निर्णय त्यावेळी का घेतला होता हे सांगताना ढोबळे यांनी अजितदादा यांच्याकडे बोट दाखवले.
सासूबरोबर वाद झाला की, आपण बाजूला राहावे असा विचार सून करते. त्याच पद्धतीने मी बाजूला राहण्याचा विचार केला, पण वाटणीला पुन्हा सासूच आली. हे लक्षात आल्यानंतर मी अजित पवारांना नमस्कार करायचे ठरवले आहे. ज्या माणसाने इतका त्रास दिला, आमचे नुकसान केले, अशा फटकळ माणसाच्या तोंडाला लागण्यापेक्षा आणि तिथं सातत्याने अपमानित होण्यापेक्षा मी त्यांना श्वास घ्यायला मोकळी जागा देतोय. आपल्या अपमानावर कुणाचा अहंकार पोसला जात असेल तर तो त्यांना लखलाभ असो, असे ढोबळे म्हणाले.