ब्रेकिंग! अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत
लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून अजितदादा पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर अजितदादा यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी द्यायला नको होती, असे म्हणत जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता अजितदादांनी आज पुतण्या युगेंद्र पवार याच्या उमेदवारीवर भाष्य केले.
अजितदादा बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र यांच्याशी होणार आहे. आज या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. अजितदादांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला तर, युगेंद्र यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत अगदी शांततेत उमेदवारी दाखल केली. अर्ज दाखल करण्यापूर्वी अजितदादा म्हणाले की, मी लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करून चूक केली.
मात्र, आता हीच चूक यंदाच्या विधानसभेत शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती. मात्र, आता त्यांनी मी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती केली असून, त्यांनी ही चूक करायला नको होती. पण ती चूक आता त्यांनी केली असून मतदार त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे अजितदादा म्हणाले.