महाराष्ट्र
संजय राऊतांचा बदलला सूर अन् नूर! भाजपबद्दल चकार शब्द नाही

- पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका झाली. त्यांचे शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. विशेष म्हणजे, त्यांनी भाजपबद्दल चकार शब्द काढला नाही. एवढेच नव्हे तर, आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना, राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
- 102 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर राऊत यांचा हा बदललेला सूर आणि नूर बुचकाळ्यात टाकणारा आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राऊत हे त्यांच्या भांडुप येथील घरी दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी भांडुप येथील निवासस्थानी शिवसैनिकांची गर्दी झाली होती. ते तुरुंगातून बाहेर आल्याने आता भाजप आणि शिंदे गट विरुद्ध राऊत असा सामना रंगणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
राऊत यांनी काल शिंदे गटावर केलेल्या टीकेमुळे उद्यापासून त्यांचा आक्रमकपणा पाहायला मिळेल, असे वाटले. पण राऊत आज सकाळी पत्रकारांना सामोरे गेले, त्यावेळी ते नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करतील, असे वाटत होते. मात्र, त्यांची सुरुवातीपासूनच भाषा मवाळ होती. - ईडी किंवा ज्यांनी-ज्यांनी हे कटकारस्थान रचले, त्यावर मी टिप्पणी करणार नाही. त्यांना जर यात आनंद मिळाला असेल तर, मी सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी आहे, हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा कुठे गेला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.



