सोलापूर ब्रेकिंग! वीजचोरांना भलताच दणका

सोलापूर जिल्ह्यातील 396 वीजचोरांवर महावितरणने मंगळवारी एकाच दिवशी कारवाई केल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले असून, विजेच्या गैरवापरावर करणाऱ्यांवरही महावितरणने कारवाई केली आहे.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या नेतृत्वात मंगळवारी एकाच दिवशी कारवाई करण्याचे ठरविण्यात आले.
जिल्ह्याभरात 1779 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा 396 ठिकाणी वीजचोरी आढळून आल्या. यामध्ये पंढरपूर विभागात सर्वाधिक 134, बार्शी 90, अकलूज 80, सोलापूर ग्रामीण 78 तर सोलापूर शहर विभागात 14 वीजचोऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांवर भारतीय विद्युत अधिनियम कलम 135 व 138 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच विजेचा गैरवापर करणाऱ्या 21 ग्राहकांवर देखील कलम 126 अंतर्गत दंडात्मक कारवाई होणार आहे. याशिवाय शेतीपंपाच्या 167 अनाधिकृत केबल व आकडे काढून टाकण्याचे कामही वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे.