क्राईम
दहा वर्षांनी पाळणा हलला, बारशावरुन पुण्याला येतांना घात झाला

दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला येत असणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला मद्यधुंद अवस्थेत स्कॉर्पिओ कार चालवत धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडली. मद्यधुंद तरुण चालकांना अटक करण्यात आली आहे.
मृणालिनी अजय बेसरकर (वय ३८), आशालता हरिहर पोपळघट (वय ६५), अमोघ बेसरकर (६ महिने), दुर्गा सागर गीते (वय ७) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अजय अंबादास बेसरकर (वय ४०), शुभांगिनी सागर गीते (वय ३५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर विशाल चव्हाण व कृष्णा केरे असे अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे आहेत. विशाल चव्हाणने कृष्णा केरे याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतांना देखील गाडी चालवण्यास दिली. ऐवढच नाही तर केरे व चव्हाण हे दोघे दारू पिऊन गाडी चालवत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.