नादच खुळा! जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी…
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे. पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर आता मराठा समाजाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. नारायण गडाच्या एकूण नऊशे एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलिसांनी जरांगेंच्या मेळाव्याला परवानगी देत तब्बल सोळा अटी घातल्या आहेत. मेळाव्यात प्रक्षोभक भाषण तसेच समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणार नसल्याची देखील अट पोलिसांनी घातली आहे. दरम्यान, हा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाने जोरदार कंबर कसली आहे.
या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे जरांगे यांचा दसरा मेळावा नारायण गडावरील नऊशे एकरावर घेतला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दोनशे एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय दहा वैद्यकीय कक्षही उभारण्यात आले आहेत.
याचवेळी शंभरहून अधिक रुग्णवाहिका या मेळाव्यात तैनात करण्यात येणार आहेत. या मेळाव्यासाठी नारायणगडावर पाचशे क्विंटल बुंदीचा महाप्रसाद होणार आहे. जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जरांगे यांच्या मेळाव्यासाठी आयोजकांकडून रात्रंदिवस मेहनत घेतली जात आहे. मेळाव्यानंतर महाप्रसाद असल्याने परिसरात टँकर आणि बाटल्यांमधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.