सोलापूर

सोलापुरात सशस्त्र दरोड्याचा प्लॅन

सोलापूर (प्रतिनिधी) हत्तुरे वस्ती ते पत्रकार भवन या मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे.पोलिस पाठलाग करत असताना चारचाकीतील सहापैकी चौघेजण संधी साधून फरार झाले आहेत.विशाल कृष्णप्पा बंडीवडार व अनिल शिवप्पा वड्डर (दोघेही रा.हनगल,हावेरी कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नवरात्र महोत्सवामुळे विजापूर नाका पोलिसांचे वाहन गुरुवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान विजयपूर रोडवरून गस्त घालत होते.त्यावेळी एमएच १२ पासिंग असलेल्या चारचाकीतील व्यक्तींबद्दल पोलिसांना संशय आला.पोलिसांनी पुढे नेलेले वाहन सात रस्त्याच्या दिशेने वळविले आणि त्या चारचाकीतील संशयितांनी वाहनाचा वेग वाढविला.वेगवेगळ्या भागातून संशयितांनी त्यांचे वाहन महावीर चौकामार्गे पत्रकार भवन चौकाच्या दिशेने वळविले. पण,त्यांचा पाठलाग करताना पोलिसांनी त्या चौकात एक डंपर रस्ता दुभाजकाजवळ आडवा लावला होता. संशयितांना आपली गाडी तेथून जाईल,असे वाटले पण त्यांचा अंदाज हुकला. त्यांच्या गाडीची धडक दुभाजकाला व डंपरला बसली.
पोलिस मागून येत असल्याने मागे बसलेले चौघे उतरून कंबर तलावाच्या दिशेने पळून गेले.एकाचा पाठलाग करून तर एकाला वाहनातच पोलिसांनी पकडले.संशयित चोरट्यांच्या वाहनाची तपासणी केल्यावर पोलिसांना त्यात लहान-मोठे तीन कटर,कुऱ्हाडी,एक्साब्लेड,स्क्रू ड्रायव्हर, इलेक्ट्रिक कटर मशिन,लोखंडी हातोडा,सहा कापडी मास्क आढळले. चारचाकीसह (एमएच.१२, टीडी २२३८) दरोड्यासाठी आणलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची (८ ऑक्टोबरपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड तपास करीत आहेत.

दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
कर्नाटकातील विशाल बंडीवडार,अनिल वड्डर, प्रशांत ऊर्फ परश्या, कृष्णा ऊर्फ कृष्णप्पा बंडीवडार, प्रवीण व अनंत (चौघेही रा. चिनहळ्ळी, कर्नाटक) हे सर्वजण दोन दिवसांपूर्वीच सोलापूर शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गावातून निघाले होते. विजापूर नाका पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला असून हत्तुरे वस्तीजवळ संशयितरित्या दोघे फिरत होते. पोलिसांनी त्यांच्याकडे पहाताच त्यांनी तेथून पळ काढत त्यांनी आणलेल्या चारचाकी वाहनाकडे धाव घेतली. पोलिस पाठलाग करत असल्याचे जाणवताच त्यांनी आपले वाहन वेगवेगळ्या मार्गाने नेले. पण, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून सहापैकी दोघांना अटक केली. विशाल व अनिल हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कर्नाटक व इचलकरंजी पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरु आहे.

Related Articles

Back to top button