खुशखबर! कावासकीने भारतात लाँच केली सुपरबाईक

कावासकीने भारतात आपली नवी बाईक लाँच केली आहे. Kawasaki Z650RS असे या बाइकचे नाव असून ही बाईक हिरव्या आणि लाल रंगात उपलब्ध असेल. 649cc दमदार इंजिन असलेल्या या बाइकमध्ये कंपनीने बरेच अपडेटेड फीचर्स दिले आहेत.
या अपडेटेड 2024 Kawasaki Z650RS चा लूक आणि डिझाईन सध्याच्या मॉडेलसारखीच आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत कंपनीने 6.99 लाख रुपये ठेवली आहे. बाईकच्या समोरील बाजूला गोल LED हेडलाइट तुम्हाला पाहायला मिळेल. याशिवाय बाईक मध्ये देण्यात आलेली स्लिम इंधन टाकी आणि स्टबी टेल-सेक्शन गाडीला आणखी आकर्षक बनवतो. तसेच या बाईकमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि सस्पेंशनसाठी मागील बाजूस मोनोशॉक युनिट देण्यात आले आहे.
Kawasaki Z650RS 2024 मध्ये 649cc, लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून 68bhp पॉवर आणि 64Nm टॉर्क जनरेट करते. या रेट्रो बाईक मध्ये 2 ट्रॅक्शन कंट्रोल मोड आहेत. यातील पहिला म्हणजे स्पोर्ट मोड आहे, जो बाईक स्पोर्टी पद्धतीने चालवण्याची परवानगी देतो. आणि दुसरा सेफ्टी मोड आहे, जो अपघात रोखण्यासाठी उपयुक्त आहे.



