डॉक्टर महिलेने उचलले टोकाचे पाऊल
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन एका महिलेने गोदावरी नदीत उडी मारत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आई डॉक्टर असून तब्बल दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर केवळ आईचाच मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सहा महिन्याच्या बाळाचा शोध सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये महिला डॉक्टरने सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केली असून नक्की या महिलेने उडी का मारली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, पैठणच्या पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात महिलेने सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन उडी टाकली. डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ३० वर्षे वय असणाऱ्या या महिलेला दोन मुले असून, सहा वर्षाचा मोठा मुलगा असून सहा महिन्याचा छोटा मुलगा आहे, अशी माहिती मिळाली आहे.
मला चांगतपुरीला जायचे आहे, असे म्हणत पूजा ही काल रिक्षास्टँडवर येत रिक्षात बसली. पावणे सातच्या सुमारास पाटेगाव पुलावर रिक्षा आल्यावर पाणी बघायच्या निमित्ताने पूजा रिक्षातून उतरली. रिक्षातून खाली उतरताच गोदावरी पात्रात पूजाने बाळासह उडी मारली. रिक्षावाल्याने आरडाओरडा करताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. पैठण पोलिसांना खबर कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याबाबत अधिकचा तपास सुरु आहे.